ब्रेकींग : द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठींबा देणार ?

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रपतीपदाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठींबा देण्याची शक्यता असून उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत खासदारांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. याबाबत लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

काल माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत खासदारांची बैठक पार पडली. यात काही खासदारांनी दांडी मारल्याने शिवसेनेच्या खासदारांमधील अस्वस्थतेची चर्चा सुरू झाली. या बैठकीत उपस्थित बहुतांश खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी केली. त्या आदिवासी समूहातील असून भाजपच्या उमेदवार असल्याचे याप्रसंगी नमूद करण्यात आले. ही मागणी ऐकून उध्दव ठाकरे यांनी याला संमती दर्शविल्याची माहितू सूत्रांनी दिली आहे. मात्र यासाठी भाजपकडून आमंत्रण देण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. शिवसेनेतर्फे लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

खासदार संजय राऊत यांनी यशवंत सिन्हा यांना शिवसेनेने मतदान करण्याची मागणी कालच्या बैठकीत केली होती. ही मागणी डावलून उध्दव ठाकरे यांनी बहुतांश खासदारांची मागणी मान्य केल्यास याचा राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अर्थात, याबाबत अधिकृत घोषणा होऊन शिक्कामोर्तब झाल्यावरच घटनांना वेग येण्याची शक्यता आहे. याआधी भाजपसोबत असतांना शिवसेनेने २००७ सालच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत युपीएच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना मतदान केले होते. एक मराठी महिला राष्ट्रपती होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. तर आता याच्या अगदी उलट म्हणून महाविकास आघाडीच्या निर्णयाच्या विरोधात द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची तयारी शिवसेनेने सुरू केल्याचेही यातून अधोरेखीत झाले आहे.

Protected Content