अखेर द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठींबा ! : शिंदे गटासोबत नरमाईची भूमिका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रपतीपदाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना खासदार मतदान करणार असल्याची महत्वाची घोषणा पक्षाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज केली आहे.

काल माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत खासदारांची बैठक पार पडली. यात काही खासदारांनी दांडी मारल्याने शिवसेनेच्या खासदारांमधील अस्वस्थतेची चर्चा सुरू झाली. या बैठकीत उपस्थित बहुतांश खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी केली. त्या आदिवासी समूहातील असून भाजपच्या उमेदवार असल्याचे याप्रसंगी नमूद करण्यात आले. ही मागणी ऐकून उध्दव ठाकरे यांनी याला संमती दर्शविल्याची माहितू सूत्रांनी दिली आहे. मात्र यासाठी भाजपकडून आमंत्रण देण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

या बैठकीनंतर आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना शिवसेनेचे सर्व खासदार हे एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करणार असल्याची घोषणा केली. मुर्मू यांना पाठींबा म्हणजे भाजपला पाठींबा नव्हे असे देखील त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. तर युतीत असतांना शिवसेनेने कॉंग्रेसच्या दोन उमेदवारांना पाठींबा दिला होता याकडे देखील त्यांनी लक्ष वेधून घेतले. यातून उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत नरमाईची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content