उदयापासून बारावीची परीक्षा; राज्यातील १५ लाख विद्यार्थी देणार परीक्षा

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा बुधवारपासून (ता. २१) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नियमित, खासगीरीत्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह श्रेणीसुधार योजनेअंतर्गत, आयटीआय आणि पुनर्परीक्षार्थी अशा एकूण बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्या ५६ हजार ६१६ ने वाढली आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा आयोजित केली आहे. राज्यातील १० हजार ४९६ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. राज्यात तीन हजार ३२० मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित केली आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक उपस्थित होत्या. या परीक्षेसाठी आठ लाख २१ हजार ४५० विद्यार्थ्यांनी आणि सहा लाख ९२ हजार ४२४ विद्यार्थींनींनी नोंदणी केली आहे. एकूण १० हजार ४९७ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३३२० मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित केली आहे.

Protected Content