सावखेडा ग्रामस्थांचे दारूबंदीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील सावखेडा येथील ग्रामस्थ लक्ष्मीकांत कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विट करून गावात ठिकठिकाणी होत असलेली हातभट्टीची दारू कायमस्वरूपी बंद करावे, अशी मागणी ट्विटद्वारे केली आहे.

ट्विटसोबत ग्रामस्थांनी सह्यानिशी केलेली मागणी व ग्रामपंचायतीच्या ठरावाची प्रत देखील शेअर केली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीत गावात ठिकठिकाणी हातभट्टी व मटका जुगाराला ऊत आलेला आहे. ह्यामुळे गावातील तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळत असून घरात कौटुंबिक कलह निर्माण होत असून गावातील संपूर्ण दारूविक्री व मटका जुगार कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीकडे करून ग्राम पंचायतीने तसा ठराव देखील पारित केलेला आहे.

ग्रामस्थांनी याआधी राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्यात तरीही ठोस अशी कार्यवाही होताना दिसून आली नाही. आपण मुख्यमंत्री होण्याआधी दिवंगत आनंद दिघे सोबत असताना ठाणे येथील डान्सबार फोडून बंद केले होते. पण आम्ही तसा पवित्रा घेऊन कायदा हातात घेऊ शकत नाहीत म्हणून आपण नव्याने मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली असून आमच्या गावातील दारूबंदी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. आपण कार्यवाही करावी आपले उपकार होतील अशी मागणी ट्विटद्वारे केली आहे.

आमच्या सावखेडा गावात काही व्यक्तींनी दारु व्यवसायाचा उच्छाद मांडला आहे. गावठी दारूच्या वाढत्या प्रमाणामुळे गावांतील अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली असून अनेक महिलावर तिशीच्या घरात विधवा होण्याची वेळ आलेली असून त्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे. गावातील चोरी होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. दारुड्यामुळे गावातील तरुणींना व महिलांना गावात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.तरुण मोठ्या प्रमाणात दारू, मटक्याच्या आहारी गेल्याने तरुणांची लग्ने होण्यास देखील अडथडे येत आहेत. गावाशेजारील धावडे, मुंगसे, दापोरी, रुंधाटी आदी गावातील नागरिकही ह्या दारूकडे ओढला जात असून सावखेडा गावात जवळपास सहा ते सात दारूचे अड्डे आहेत.

त्यासोबतच अवैध देशी, विदेशी दारू बिनदिक्कतपणे विकली जात असून तरुणाई विनाशाच्या दिशेने जात आहे.म्हणून ग्राम पंचायतीने देखील सट्टा जुगारासह,अवैध दारू,हातभट्टीची दारू कायमस्वरूपी बंद होणेकामी दि.24 जून 2022 रोजी ठराव क्र.189 अन्वये ठराव पारित केलेला आहे. त्यामुळे ह्या अवैध धंद्याचा कायमचा बिमोड करून तरुण पिढीला यापासून वाचवण्याचे काम आपल्या हातून व्हावे अशी याचना ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना ट्विट द्वारे केली आहे.

गावांतील अवैध, हातभट्टी दारूविक्री, मटका, जुगारामुळे गावाची प्रतिमा मलीन होत असून शिवाय तरुणाई व्यसनाधीनतेकडे जात असून परिणामी लग्न होण्यास देखील अडचणी होत आहे. दारूमुळे तिशीच्या घरात बहुसंख्य महिलावर विधवा होण्याची वेळ आलेली आहे.यामुळे गावातील ह्या दारुबंदीचा कायमचा नायनाट करावा अशी सावखेडा ग्रामस्थांनी मागणी केली असून त्या मागणीनुसार मी लक्ष्मीकांत कदम (ग्रामस्थ) मुख्यमंत्र्यांना ट्विट केलं आहे.

 

Protected Content