शेतकरी आंदोलनाच्या बदनामीसाठी तिरंगा अपमानाचे कुभांड : शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । दिल्लीतील शेतकरी आंदोलनास बदनाम करण्यासाठी तिरंगा अपमानाचे कुभांड रचण्यात आल्याचा आरोप आज शिवसेनेने करत यावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनात आज तिरंगा अपमानाच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लबोल करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, लाल किल्ल्यावर शेतकऱयांच्या एका गटाने गोंधळ घातला. त्यात जो तिरंग्याचा अपमान झाला त्यामुळे आपले प्रिय पंतप्रधान मोदी अत्यंत दुःखी झाले आहेत. ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी त्यांचे मन मोकळे केले. ‘२६ जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान झाला. त्यामुळे देश दुःखी झाला’, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधानांचे असे म्हणणे असेल तर ते योग्यच आहे. देशातल्या सवाशे कोटी नागरिकांच्या भावना याच आहेत. तिरंग्याचा सन्मान हाच राष्ट्राचा सन्मान असतो.

यात पुढे म्हटले आहे की, शेतकऱ्यांना रस्त्यावर तडफडून मरू देणे हा तर तिरंग्याचा भयंकर अपमान आहे. तिरंग्याच्या रक्षणासाठी जवानांची फौज सीमेवर प्राणांची बाजी लावत आहे. त्यात पंजाबच्या शेतकऱयांची पोरे मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यांचे बळी घेऊन तिरंग्याचा काय सन्मान राखणार आहात?

साठ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱयांचा एक गट त्या दिवशी लाल किल्ल्यावर घुसला. त्यांनी हडकंप माजवला. त्यात तिरंग्याचा अपमान झाल्याचा प्रचार भाजप सायबर फौजांनी केला. तो अपप्रचारच ठरला. जे चित्रीकरण समोर आले त्यात तिरंग्याचा अपमान वगैरे झाल्याचे कुठेच दिसत नाही. तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकतच होता, पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले हे उघड झाले असा आरोप करत यावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Protected Content