मुक्ताईनगर पंचायत समिती सभापतीपदी विकास पाटलांची अविरोध निवड

मुक्ताईनगर प्रतिनिधी | येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी विकास पाटील यांची अविरोध निवड करण्यात आली असून या माध्यमातून एकनाथराव खडसे यांनी पं.स. वरील आपले वर्चस्व कायम राखल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुक्ताईनगर येथील पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा साळुंके यांनी अलीकडेच जिल्हा परिषद अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. यानंतर शुक्रवारी सभापती निवडीसाठी विशेष सभा झाली. पं.स.च्या सभागृहात झालेल्या सभेत तहसीलदार निकेतन वाडे पीठासीन अधिकारी होते. या सभेत सभापती पदासाठी निमखेडी बुद्रूक गणातील सदस्य विकास समाधान पाटील यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे दुपारी ३ वाजता तहसीलदारांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. विकास पाटील हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक आहेत.

नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, महसूल लिपिक शिराळे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. याप्रसंगी सभापती विकास पाटील, उपसभापती सुनीता चौधरी, सदस्या सुवर्णा साळुंके, तर भाजप सदस्यांमध्ये विद्या पाटील, राजेंद्र सवळे, शुभांगी भोलाणे उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती पाटील यांचा राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सदस्यांनी सत्कार केला.

Protected Content