भुसावळ पालिकेसमोर शिवसेना करणार आंदोलन

भुसावळ प्रतिनिधी | शहरातील पथदिव्यांची समस्या न सोडविल्यास शिवसेना नगरपालिकेसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा आज शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी दिला आहे.

भुसावळ शहरात नगरपालिका, महावितरण व पथदिव्यांचे कंत्राट घेतलेल्या इइएसएल कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे भर दिवसा अनेक ठिकाणी पथदिवे सुरूच होते, याबाबत अनेक वेळेस महावितरण, नगरपालिका प्रशासनास तक्रारी भुसावळ शहर शिवसेनेतर्फे करण्यात आल्या होत्या. परिणामी काल कन्झ्युमर लाइनवरून वीज जोडणी केलेली असल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी थेट पथदिवेच काढून घेतले.

या सर्व प्रकारचा नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतो आहे. शहरातील ५० पेक्षा जास्त गल्ल्या अंधारात आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी भुसावळ शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी नगरपालिकेचे वीज अभियंता सुरज नारखेडे आणि इइएसएल कंपनीच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. समनव्यातुन हा प्रश्न मार्गी लावून पथदिवे पुन्हा सुरू करावे, नवीन स्ट्रीट लाईट लाईनसाठी नियोजन करावे, शक्य असल्यास सर्व ठिकाणी टाइमर बसवावे अश्या सूचना बऱ्हाटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. उपशहर संघटक नबी पटेल, विक्की चव्हाण यांनी घडलेला प्रकार अधिकाऱ्यांच्या समोर मांडला.

भुसावळ शहरातील पथदिवे वेळेत सुरू आणि वेळेत बंद न झाल्यास शिवसेनेचे  जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, कार्यलयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, उपतालुका प्रमुख पप्पू बारसे व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ नगरपालिकेच्या समोर कंदील लावण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!