शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी पवारांना घातली गळ ?

71349056

मुंबई, वृत्तसंस्था | शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात अचानक झालेल्या भेटीमागे मोठे कारण असल्याचे समोर येत आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास सज्ज असलेले शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासाठी राऊत यांनी पवारांची भेट घेतली होती. आदित्य यांना बिनविरोध निवडून द्या, अशी विनंती राऊत यांनी या भेटीत केल्याचे सूत्रांकडून समजते.

 

अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उलथापालथ सुरू असताना शनिवारी दुपारी अचानक संजय राऊत यांनी शरद पवारांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. ही भेट कौटुंबिक होती, असे राऊत यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. मात्र, या भेटीत नक्कीच काहीतरी राजकीय असावे, असे आडाखे बांधले जात होते. त्यात तथ्य असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांचा संभाव्य विधानसभा प्रवेश सुकर व्हावा, यासाठी ही भेट झाली होती. आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. आदित्य हे वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जाते. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. सध्या शिवसेनावासी झालेले सचिन अहिर हे आधी येथून आमदार होते. अहिर यांनी पक्ष बदलला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा नव्या जोमाने लढवण्याच्या प्रयत्नांत आहे. मात्र, आदित्य येथून उभे राहिल्यास त्यांना विरोध होऊ नये, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे समजते.

पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली तेव्हा शिवसेनाप्रुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी बारामतीतून उमेदवार दिला नव्हता. हा पदरही या मागणीला आहे. पवारांनी शिवसेनेची ही विनंती मान्य केल्यास पवार कुटुंबातील पुढच्या पिढीला म्हणजेच, रोहित पवार किंवा पार्थ पवार यांनाही भविष्यात त्याचा फायदा मिळू शकतो, असाही एक कयास आहे.

Protected Content