शिवसेनाप्रमुखांचा दक्षिण मुंबईतील पुतळाही वादाच्या भोवऱ्यात

balasaheb statue

मुंबई, वृत्तसंस्था | शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मारकावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांचा दक्षिण मुंबईत उभारण्यात येणारा प्रस्तावित पुतळाही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दक्षिण मुंबईतील जागतिक वारसा असलेल्या भागात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारू नये, अशी दक्षिण मुंबईतील एका रहिवासी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) समोर प्रस्तावित आहे.

 

फेडरेशन ऑफ रेसिडेंट ट्रस्ट्स (फोर्ट) या संघटनेने हे पत्र मुख्यमंत्र्याना लिहिले आहे. या शिखर संघटनेत ओव्हल कुपरेज रेसिडेंट असोसिएशन (ओसीआरए), नरिमन पॉइंट चर्चगेट सिटीझन असोसिएशन (एनपीसीसीए) आणि ओव्हल ट्रस्ट या संघटनेचा समावेश आहे. ज्या ठिकाणावर बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारला जाणार आहे, ते ठिकाण युनेस्को जागतिक वारशांच्या यादीत येते. या कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्यासाठी योग्य पर्यायी जागा शोधावी, अशी विनती या पत्रात करण्यात आली आहे.

इथूनच ‘गेट वे ऑफ इंडिया’कडे जाण्याचा मार्ग असल्याने इथे नेहमीच वाहनांची गर्दी होत असते. या मुळे या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते . या कारणामुळे देखील हा पुतळा नियोजित ठिकाणी उभारू नये, असे पत्रात म्हटले आहे. पुतळ्याची नियोजित जागा आणि पुतळ्याची उंची पाहता, या चौकातील वाहतुकीच्या नियमनावर लक्ष ठेवण्यात मोठे अडथळे निर्माण होतील, असे पत्रात म्हणण्यात आले आहे.

Protected Content