राहुल आणि प्रियांका गांधींना मेरठ पोलिसांनी अडवले

Rahul and Priyanka Gandhi

 

लखनऊ वृत्तसंस्था । नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधातील आंदोलना दरम्यान, मेरठमध्ये मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी मेरठ येथे दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी मेरठ शहराबाहेरच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या गाडीचा ताफा अडवला. मृत आंदोलकांच्या कुटुंबियांची भेट न घेताच पोलिसांनी त्यांना माघारी लावले. कलम १४४ लागू असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना माघारी जाण्यास सांगितले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात आंदोलन सुरू आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागले. मेरठमध्ये भडकलेल्या हिंसेत चार आंदोलकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. त्यामुळे मेरठमध्ये तणावाचे वातावरण असून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नये, म्हणून मेरठ, मुजफ्फरनगर, बुलंदशहर आणि सहारनपूर येथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मेरठला रवाना झाले होते. मात्र उत्तर प्रदेशच्या सीमेवरच पोलिसांनी त्यांना अडवून मेरठला जाण्यास मज्जाव केला. कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचे कारण देऊन पोलिसांनी त्यांना मेरठला जाण्यास मनाई केली. राहुल आणि प्रियांका यांनी केवळ तीन जणांनाच मेरठमध्ये जाऊ देण्याची परवानगीही पोलिसांना मागितली. मात्र पोलिसांनी त्यांची ही विनंती फेटाळून लावत त्यांना मेरठमध्ये जाऊ देण्यास असमर्थता दर्शवली.

Protected Content