शिंदे गट सरकारचा पाठींबा काढण्याच्या तयारीत !

गुवाहाटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निर्देशानंतर एकनाथ शिंदे यांचा गट राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढण्याच्या तयारीत असून या संदर्भातील पत्र आजच राज्यपालांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवरून आज सुप्रीम कोर्टात तीन याचिकांवर सुनावणी झाली. यात नरहरी झिरवाळ यांच्या अपात्रतेसह आमदारांच्या अपात्रतेबाबत ११ जुलै रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. तर आमदारांना उत्तर देण्यासाठी सुध्दा १२ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पाच दिवसांची मुदत प्रदान करण्यात आलेली आहे. अर्थात, राज्यातील राजकीय पेच हा आता वाढल्याचे दिसून येत आहे. तथापि, यातून शिंदे गटाच्या आमदारांना वेळ मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. यामुळे गुवाहाटीत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर जल्लोष करण्यात आल्याचे वृत्त आहे.

एकीकडे सुप्रीम कोर्टाने वेळ वाढवून दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचा गट राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढून घेणार असून याबाबतचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. कदाचित आजच हे पत्र देण्यात येईल. यानंतर राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना बहुमत सिध्द करण्यासाठी निर्देश देऊ शकतात. असे झाल्यास महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे.

Protected Content