कृषी कायदा रद्द करा – विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी

नवी दिल्ली- राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षातील पाच नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कृषी कायदा रद्द करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली.

या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, सीपीएम नेते सीताराम येचुरी, सीपीआय महासचिव डी राजा आणि डीएमके नेते टी. के. एस. इलेनगोवन उपस्थित होते. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्र सरकारने आणलेले कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. त्यामुळे ते रद्द करण्यात आले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. शेतकऱ्यांच्या ताकदीसमोर कुणीच उभा राहू शकत नाही. शेतकरी आता मागे हटणार नाहीत आणि कुणालाही घाबरणार नाहीत. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरूच ठेवतील, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. अत्यंत शांततेत त्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. हे कायदे भारताच्या हिताचे नाहीत. या कायद्यामुळे अन्न सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया सीपीएम नेते सीताराम येचुरी यांनी व्यक्त केली. आम्ही राष्ट्रपतींना भेटलो. या विधेयकावर नाराजी व्यक्त केली. तसेच देशातील शेतकऱ्यांचं म्हणणंही त्यांच्या पुढे मांडलं. कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याने राष्ट्रपतींनी त्यात हस्तक्षेप करावा म्हणून आम्ही राष्ट्रपतींना साकडे घातले आहे, असं डी. राजा यांनी सांगितलं.

 

Protected Content