…तर विषय मांडायचा कुणाकडे – फडणवीस

fadnavis news

नागपूर वृत्तसंस्था । नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार न करणे याचा अर्थ नागपूर अधिवेशन हे या सरकारला ‘सिरियस’ अधिवेशन वाटत नाही. केवळ वेळकाढूपणाचे धोरण म्हणून हे अधिवेशन कागदोपत्री घेण्याचा फास हे सरकार करत आहे, अशी खोचक टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. मंत्रीच नाही, मग विषय मांडायचे कुणाकडे, असा टोलाही फडणवीस यांनी सरकारला लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

फडणवीस म्हणाले, ‘आम्ही काळजीवाहू सरकार असताना अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात निर्णय घेतला होता. सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील मदत करून असेही म्हटलो होतो. त्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत कमी असून, शेतमालाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रूपये, तर बागायत शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी केली होती. त्यांनीच केलेल्या मागणीची आम्ही आठवण करू देत आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.

तीन पक्षांचं सरकार स्थापन झाले असले तरी शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भातला निर्णय झालेला नाही. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांची चर्चा नाही. सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती, पण अद्याप मिळालेली नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीने सरसकट कर्जमाफी आणि कोरा सातबारा करण्याचे आश्वासनं दिलं आहे. ते कधी करणार त्याचा कार्यक्रम सरकारनं जाहीर करायला हवा. पण सरकार वेळकाढूपणा करत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

Protected Content