मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक

भुसावळ प्रतिनिधी | शहरातील प्रत्येक दुकानावरील पाटी मराठीत असावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्यात आले.

राज्य मंत्रीमंडळाने अलीकडच्या बैठकीत राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात असा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमिवर, मनसेच्या भुसावळ शाखेने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुकानांवर ठळक अक्षरात मराठीत फलक लावा अन्यथा, अंगावर बाहेरुन बाम लावण्याची वेळ येईल, अशी तंबी देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानदारांना बामच्या बाटल्यांचे वितरण केले. तर मराठी भाषेतून फलक लावणार्‍या दुकानदारांना गुलाबपुष्प देवून सन्मानीत करण्यात आले.

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांच्या नेतृत्वात इंग्रजी फलक असलेल्या दुकानदारांना भेटून त्यांना मराठी भाषेत फलक लावण्याची विनंती करण्यात आली. मराठीतून पाट्या लावा, अन्यथा बाहेरुन हा बाम लावण्याची वेळ येऊ शकेल, असा इशारा देत मनसेच्या पदाधिकार्‍यांनी बामच्या बाटल्यांचे वितरण केले. महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, ती सर्वांना समजते. यामुळे इंग्रजी फलक बदलून मराठीत लावा असेही यावेळी दुकानदारांना सांगण्यात आले.

या आंदोलनामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, तालुकाध्यक्ष धीरज वाघमारे, शहराध्यक्ष प्रतीक भंगाळे, रितेश मेहरा, लोकेश देवकर, जय पाटील, दिनेश पाटील, शिवा वाढे, तुषार जाधव, विलास कोळी आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Protected Content