महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ची नांदी; शिंदेंच्या पुढील निर्णयावर सर्व अवलंबून !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या अडीच वर्षांपासून अतिशय स्वस्थ बसलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सहकार्‍यांसह नॉट रिचेबल झाल्यानंतर राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू झाल्याची नांदी झडल्याचे मानले जात आहे. येत्या काही तासांमध्ये याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना महत्वाचे स्थान असले तरी त्यांना काही चांगली वागणूक मिळत नव्हती. त्यांना मुख्यमंत्री नाही तर किमान उपमुख्यमंत्रीपद तरी हवे असले तरी हे काही मिळाले नाही. यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला फटका बसल्याने या पक्षातील अंतर्गत कलह समोर आला होता. यानंतर काल झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेची पुन्हा तीन मते फुटल्याचे समोर आल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे संतप्त झाले. त्यांनी आज आपल्या आमदारांची बैठक बोलावली. मात्र यानंतर रात्रीपासूनच एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थकांसह अहमदाबाद येथे दाखल झाल्याने मविआ सरकार संकटात आले आहे.

भाजपच्या अनेक नेत्यांनी आधीच राज्यात ऑपरेशन लोटसची शक्यता वर्तविली होती. नेत्यांनी अनेकदा केव्हा सरकार पडणार याबाबतची भाकितेदेखील केली होती. तथापि, आता एकनाथ शिंदे हे आपल्या सहकार्‍यांसह गायब झाल्याने सरकारच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह लागले आहे. यामुळे आता राज्यात ऑपरेशन लोटसचा प्रारंभ झाल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Protected Content