एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह अहमदाबादमध्ये ! : सरकार धोक्यात ?

अहमदाबाद-वृत्तसेवा | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या ११ समर्थक आमदारांसह अहमदाबाद येथील हॉटेलमध्ये दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काल झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे तीन मते फुटल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली होती. यानंतर एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह नॉट रिचेबल झाले आहेत. आज सकाळी ते गुजरातमधील अहमदाबाद येथील एका हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. अपक्ष आमदारांसारखेच शिंदे समर्थक आमदारांमध्ये नेतृत्वाबाबत प्रचंड नाराजी आहे. गेली अडीच वर्ष आम्हाला फारशी किंमत दिली जात नव्हती. आता मात्र आम्हाला नव-नवे आदेश देऊन, आमच्यावर अविश्वास दाखवला जात आहे, अशी भावना शिंदे समर्थक आमदारांनी खासगीत मांडली आहे.

यातच एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये दाखल होण्याची चर्चा सुरू असल्याने राज्य सरकार धोक्यात आल्याचे मानले जात आहे. यात आज नेमके काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content