मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगरातून फुंकणार रणशिंग ?

मुक्ताईनगर-पंकज कपले (स्पेशल रिपोर्ट ) | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुक्ताईनगरात २० सप्टेंबर रोजी येत असून याच ठिकाणावरून त्यांची हिंदू गर्व गर्जना यात्रेचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.

मुक्ताईनगर मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त आजपासून मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याची सांगता २० सप्टेंबर रोजी मुक्ताईनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या दौर्‍याची जय्यत तयारी देखील करण्यात येत आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी आधीच प्रसारमाध्यमांशी बोलतांना या दौर्‍यातील पक्षाच्या मेळाव्यात महत्वाच्या घोषणा करण्यात येतील अशी माहिती दिली आहे.

दरम्यान, मुंबईतून आलेल्या ताज्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यव्यापी हिंदू गर्व गर्जना यात्रा काढणार आहेत. याचा प्रारंभ २० सप्टेंबर पासूनच होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. यामुळे मुख्यमंत्री मुक्ताईनगरातूनच यात्रेचा शुभारंभ करणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिंदू गर्व गर्जना यात्रा राज्यभरात काढण्यात येणार असून यात एकनाथ शिंदे हे वेळ मिळेल तसे सहभागी होणार आहेत. या यात्रेत शिंदे समर्थक आमदारांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. शिंदे समर्थक आमदारांवर जिल्ह्यातील एका मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करुन एकनाथ शिंदे यांच्याबाबत जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतले जाणार आहे. यामुळे ही यात्रा महत्वाची मानली जात आहे. उध्दव ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौर्‍याच्या आधीच ही यात्रा काढण्यात येण्याची बाब लक्षणीय आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे आगामी हिंदू गर्व गर्जना यात्रेबाबतची माहिती अद्याप देखील अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे याबाबत अधिकृत घोषणा केव्हा होणर ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content