अण्णा हजारे हे हास्यास्पद व्यक्तिमत्व; मुणगेकरांची टीका

 

पुणे: वृत्तसंस्था । अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे उघड आहे, अशी खोचक टीका भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनातून माघार घेतल्याने त्यावर टीका केली. अण्णा हाजेर हे हास्यास्पद व्यक्तिमत्त्व झालं आहे. त्यांच्या आंदोलनाचा बोलविता धनी कोण आहे हे सुद्धा उघड झालं आहे. अण्णा म्हणजे महात्मा गांधी नव्हेत. २००९ मध्ये त्यांनी केलेलं आंदोलन हा त्यांच्या प्रसिद्धीसाठीच्या नियोजनाचा भाग होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचा काय उल्लेख करायचे हे सर्वांनाच माहीत आहे, असा चिमटा मुणगेकर यांनी काढला.

शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून शांततेत आंदोलन करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. कृषी कायदे रद्द केल्याने कायदे रद्द करण्याचा पायंडा पडणार नाही, असं सांगतानाच लाल किल्ल्यावर जे झालं. त्यात शेतकरी नव्हते. एवढ्या सुरक्षेत तो व्यक्ती झेंडा लावूच कसा शकतो? असा सवालही त्यांनी केला.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी करण्यात आली. तेव्हापासून देशाच्या अर्थव्यवस्थेची घसरण सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा निर्णय अर्थव्यवस्थेसाठी नकारात्मक ठरला आहे. काल आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर झाला. हे आर्थिक सर्व्हेक्षण म्हणजे चमत्कारीकच होतं. ११ टक्के अर्थव्यवस्था सुधारेल असं सांगण्यात आलं. असं सर्व्हेक्षणच शक्य नाही. पाच टक्के सुद्धा अर्थव्यवस्था सुधारणार नाही. अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं मला तरी वाटत नाही, असं ते म्हणाले. मोदी सरकार अर्थव्यवस्थेला किरकोळपणे घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. नेहरूंनी उभं केलेलं प्लॅनिंग कमिशन मोदींनी बरखास्त केलं. सरकार आणि जनतेमधील दुवा म्हणजे प्लॅनिंग कमिशन होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं

 

Protected Content