टूलकिट वाद ; छत्तीसगडच्या माजी मुख्यमंत्र्यांना पोलिसांची नोटीस

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । टूलकिट  वादात आता छत्तीसगड पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. छत्तीसगडमधील भाजपाचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांना छत्तीसगड सिव्हिल लाईन पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.

 

 

काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या नावाने एक टूलकिट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं होतं. हे टूलकिट काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि त्यांच्यावर टीका करण्यासाठी बनवल्याला आरोप भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला होता. यानंतर काँग्रेसकडून यावर तीव्र आक्षेप घेण्यात आला होता.भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भाजपा सरचिटणीस बी. एल. संतोष आणि प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात तक्रार देखील करण्यात आली आहे.

 

आता पोलिसांनी हालचाल सुरू केली असून  हे टूलकिट खरंच काँग्रेसनं बनवलं आहे की भाजपाकडूनच अपप्रचार केला जात आहे, याविषयी पोलीस तपास करत आहेत. माजी मुख्यमंत्र्यांचा २४ मे रोजी  जबाब नोंदवला जाणार आहे.

 

 

संबित पात्रा, जे. पी. नड्डा आणि भाजपाच्या इतर नेत्यांकडून हे टूलकिट सोशल मीडियावर शेअर करून काँग्रेसवर टीका करण्यात आली होती.   राहुल गांधी, प्रियांका गांधींपासून ते काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेतेमंडळींपर्यंत सगळ्यांनीच भाजपावर टीका केली. यासंदर्भात पोलिसात तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या.

 

 

रमणसिंह यांचा बनावट टूलकिट प्रकरणात जबाब नोंदवण्यात येणार आहे. काँग्रेसनं दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याशिवाय, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टूलकिट सौम्या वर्मा या व्यक्तीने बनवलं असून ती व्यक्ती काँग्रेसच्या संशोधन विभागाशी संबंधित असल्याचा दावा भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांच्याकडून करण्यात आला आहे. “सौम्या वर्मा हिनेच हे टूलकिट लिहिलं आहे हे मी मिळवलेल्या कागदपत्रांमधून समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलीन करण्याचा या टूलकिटचा हेतू होता. वर्मा ही तिच्या प्रोफाईलवरून काँघ्रेसच्या रिसर्च विंगची सदस्य वाटत असून ती काँग्रेस नेते प्रोफेसर राजीव गौडा यांच्यासाठी काम करते”, असा दावा संबित पात्रा यांनी केला  आहे.

 

Protected Content