मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणूक २०२४ डोळ्यासमोर ठेऊन महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार कामाला लागली आहे. त्यातही महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी असल्याने अधिक सावध आहेत. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असातना केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार धक्का दिला आहे. या वेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत येईल मात्र, विधानसभा निवडणूक 2029 मध्ये भाजपा हा एकटाच सत्तेत येईल, असे वक्तव्य शहा यांनी केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना म्हटले आहे की, आपण विधानसभा निवडणूक जिंकत आहोत. नेटाने कामाला लागा. कोणत्याही सर्वे आणि वक्तव्यांवर लक्ष देऊ नका. आताची विधानसभा निवडणूक आपण जिंकत आहोत. पण आगामी म्हणजेच सन 2029 मध्ये होणारी विधानसभा महाराष्ट्रात भाजप एकटाच जिंकणार आहे. त्यामुळे सर्वांनी जोरदार तयारीला लागा. भाजप नेते शाह यांनी केलेल्या वक्तव्यामध्येच महायुती फुटण्याचे संकेत दडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कारण महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा घटक पक्ष आहे. उर्वरीत शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे मूळ पक्षासोबत बंडखोरी करुन तयार झाले असून उशीरा महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत. सहाजिकच या पक्षांच्या राजकीय भवितव्यावर चिंता निर्माण झाली आहे.