जमीन परस्पर दुसर्‍याच्या नावावर : तलाठी, सर्कलसह दोघांवर गुन्हा

शेंदुर्णी, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मृत व्यक्तीची जमीन परस्पर दुसर्‍याच्या नावे केल्याचे प्रकरण येथे उघड झाले असून या संदर्भात तलाठी, सर्कल यांच्यासह अन्य दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेंदुर्णी येथील वाडी दरवाजा भागातील रहिवासी व शेतकरी जिजाबाई देविदास माळी (वय ५५) यांनी या संदर्भात पहुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांचे पती देविदास गोविंदा माळी यांचे २८ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले. पतीच्या मृत्युनंतर त्यांनी ई-सेवा केंद्रावर जाऊन मृत देविदास माळी यांच्या नावे असलेला उतारा काढला. त्यात मृत पतीसह जनाबाई गेविंदा माळी यांच्या नावाचा सामाईक उतारा मिळाला. हे पाहून जिजाबाई यांनी तलाठ्यांना विचारणा केली असता या जमिनीचे न्यायालयात वाद असल्याचे सांगितले होते. या प्रकरणी जिजाबाई माळी यांच्या फिर्यादीवरुन अफरातफर करुन फसवणूक केल्याप्रकरणी तलाठी शांतीलाल नाईक व मंडळ अधिकारी हर्षल विश्वनाथ पाटील यांच्यासह जनाबाई माळी व अन्य एकावर पहूर पोलिसांत गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा पुढील तपास पहूर पोलीस स्थानकाचे तपास पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे व सहकारी करत आहेत.

Protected Content