कन्नड घाटात भीषण अपघात : चार प्रवासी जागीच ठार; सात जखमी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कन्नड घाटात काल मध्यरात्रीनंतर कन्नड घाटातून प्रवास करतांना वाहनावरील नियंत्रण सुटून ते दरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात चार प्रवासी जागीच ठार झाले असून सात जण जखमी झाले आहेत.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, कन्नड घाटातून जात असतांना एमएच ४१ व्ही ४८१६ या क्रमांकाच्या तवेरा गाडीचा कन्नड घाटातून प्रवास करतांना वाहनावरील नियंत्रण सुटून ते दरीत कोसळल्यामुळे जोरदार अपघात झाला. या भीषण अपघातात प्रकाश गुलाबराव शिर्के, (वय -६५); शिलाबाई प्रकाश शिर्के, (वय -६० ) ; वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी, (वय -३५) आणि पूर्वा गणेश देशमुख, (वय -०८) हे चार प्रवासी जागीच मयत झाले. तर, रूपाली गणेश देशमुख,वय ३०; अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०); कृष्णा वासुदेव शिर्के, (वय -४); जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी,( वय १७ ); सिध्देश पुरुषोत्तम पवार( वय १२ ) ;.पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय -३५) आणि अभय पोपटराव जैन, (वय ५०) हे सात जण जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार धुक्यामुळे काच पुसत असतांना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. परिसरातून नागरिक आणि वाहन चालक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमींना चाळीसगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे दोन्ही बाजूने वाहने उभे राहिल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, या भीषण अपघातामुळे कन्नड घाटातील वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काल रात्रीपासून पाऊस झाल्याने कन्नड घाटात वाहने चालवितांना अडचण निर्माण झाली असून यामुळेच हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर, वाहनधारकांनी कन्नड घाटातून अतिशय सुरक्षितपणे वाहने चालविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content