पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलथा-पालथ पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसणार आहे. महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पक्ष आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलिन होणार आहे. अशी माहिती बीआरएसचे महाराष्ट्र मुख्य समन्वयक बाळासाहेब देशमुख यांनी दिली. पुण्याच्या निसर्ग मंगल कार्यालय येथे शरद पवारांच्या उपस्थितीत 6 ऑक्टोबर रोजी बीआरएसचे कार्यकर्ते पक्षात प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, तेलंगणातील बीआरएस पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी महाराष्ट्रात बीआरएस पक्ष वाढवण्यासाठी मोठी रॅली काढली होती. त्यावेळी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी नागपूर येथे पक्ष कार्यालय देखील सुरू केले होते, मात्र काही दिवसातच गाशा गुंडाळावा लागला होता. तेलंगणामध्ये देखील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत बीआरएस पक्षाला फारसे यश आले नव्हते.
राज्यातील बीआरएसचे सर्व पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश पार पडणार आहे. बीआरएस पक्षाची महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकरणी आणि पदाधिकारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय डाव शरद पवार टाकणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आता याचा आगामी विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.