अहमदनगर प्रतिनिधी । सहसा कधीही संयम ढळू न देणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आज श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत संताप आल्याचे दिसून आले. पद्मसिंह पाटील यांच्यावरून प्रश्न विचारल्यानंतर पवार अक्षरश: भडकल्याने उपस्थित अवाक झाले.
याबाबत वृत्त असे की, सध्या राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या पार्श्वभूमिवर, आज श्रीरामपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार हे चांगलेच संतापले. एका पत्रकाराने शरद पवार यांना पद्मसिंह पाटील जे तुमचे नातेवाईक आहे तेही तुमची साथ सोडून जाण्याच्या तयारीत आहेत असं कळतं आहे असं पत्रकाराने विचारताच ते भडकले. राजकारणात नातेवाईकांचा काय संबंध? तुम्ही चुकीचं बोलत आहात, असं बोलणार असाल तर मला या पत्रकार परिषदेला कशाला बोलवायचं? माफी मागा, राजकारण आणि नातेवाईक यांचा काय संबंध? असा प्रतिप्रश्न शरद पवारांनी विचारत ते पत्रकार परिषद सोडून जाऊ लागले. मात्र अन्य पत्रकारांनी मध्यस्थी करून हा वाद सोडविल्याने पवार परत पत्रकार परिषदेत बसले.