गोंदिया-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम हिला शरद पवार गटातून निवडणूक उमेदवारी देणार असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे सांगितले. सोमवारी २६ ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा गोंदिया जिल्हा कार्यकर्ता गेळावा व पुढील विधानसभा निवडणुकी संदर्भात आढावा सभा झाली. त्यानिमित्त अनिल देशमुख गोंदियाला आले होते. त्यांनी पत्रपरिषदेत ही घोषणा केली.
गोंदियात आजच्या आढावा बैठकी संदर्भात माहिती देतांना अनिल देशमुख म्हणाले, धर्मरावबाबांची कन्या भाग्यश्री आत्राम हिने शरदचंद्र पवार यांची तीन वेळा भेट असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही भेटली. वडिलांनी अजित पवार गटात जाण्याचा घेतलेला निर्णय मला मान्य नाही, असेही ती म्हणाली.
अनिल देशमुख पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट गोंदिया-भंडारा जिल्हयातील ७ विधानसभा जागेपैकी गोंदिया जिल्हयातील तिरोडा अर्जुनी मोरगाव आणि भंडारा जिल्हयातील तुमसर या तीन जागेवर आपला दावा करणार आहे. तीन ही जागेवर पक्षांनी आपली तयारी जोमाने सुरू केली. कार्यकर्त्यांना या बाबतची माहिती या आढावा बैठकीतून देण्यात आली आहे.