श्रीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे विधानसभेच्या जागाचे वाटप आज २६ ऑगस्ट सोमवार रोजी निश्चित झाले आहे. जम्मू-कश्मीर या केंद्रशासित प्रदेशात ९० जागांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स ५१ जागांवर तर काँग्रेस ३२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. ५ जागांवर मैत्रीवर लढत होणार असून सीपीआयएम आणि पँथर्स पार्टीला २-२ जागा देण्यात आल्या आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, सलमान खुर्शीद आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हमीद कारा यांनी सोमवारी श्रीनगरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी तासभर चाललेल्या या बैठकीनंतर जागावाटप निश्चित करण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी श्रीनगरला पोहोचले होते. यावेळी त्यांनी नॅशनल कॉन्फरन्ससोबत बैठक घेऊन विधानसभेत युती केली होती.
निवडणूक आयोगाने १६ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात तीन टप्प्यात मतदान होणार आहे. येथे विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. बहुमताचा आकडा ४६ आहे.