नागपूर, वृत्तसंस्था | विधानसभेच्या तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. विधानसभेत बोलताना महाविकास आघाडीतील दुही दाखवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सामना’ हे वृत्तपत्र सभागृहात सर्वांसमोर दाखवले.
महाविकास आघाडीमध्ये विसंवाद आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी त्यांनी ‘सामना’ या वृत्तपत्रामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचे वाचनही केले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी हरकत घेतली. त्यावर बोलताना तुम्ही मंत्री बनणार आहात. जर तुम्ही माझ्या सामना वाचण्यावर हरकत घेतली तर संजय राऊत तुम्हाला मंत्री बनू देणार नाहीत, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.
सत्तेत असताना सत्ताधारी पक्षातील काही जणांनी अनेकदा सामना आणला होता. परंतु त्यावेळी कोणीही हरकत घेतली नाही. आता मी आणला आहे, मी सामनाचे सबस्क्रिप्शन घेतले आहे, असेही ते म्हणाले. पवारांबाबत काय काय बोलले गेले, उद्धव ठाकरेंबाबत काय काय बोलले गेले ? हे महाराष्ट्राला ठाऊक आहे, असे म्हणताच सभागृहात गदारोळ झाला. त्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच टोले लगावले. ज्यावरुन शिवसेनेचे आमदार, मंत्री हे चांगलेच चिडले. माझा वेळ हेच लोक खात आहेत, माझ्या आरोपांना उत्तर देऊन, असाही टोला फडणवीस यांनी लगावला.
उद्धव ठाकरेंनी निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितले होते की, आमच्यापुढे सगळे पर्याय खुले आहेत. त्याचा सोयीस्कररित्या विसर शिवसेनेला पडला आहे. तसेच यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही काँग्रेससोबत जाऊ हा शब्द दिला होता का ? असा सवालही त्यांनी केला. २५ हजार हेक्टरी मदत कोरडवाहू शेतीला आणि ५० हजार रुपये हेक्टर बागायती शेतीला देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. अल्प भूधारक शेतकऱ्यांना हे आश्वासन देण्यात आले होते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देण्यात आले होते त्याचे काय झाले ? तुम्ही दिलेला शब्द तुम्हीच पाळला नाही. तुम्ही केंद्र सरकारला मदत मागितली होती पण घोषणा केंद्र सरकारच्या जीवावर केली होती का ? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.