मुख्य निवडणुक आयूक्त अरूण गोयल यांनी दिला राजीनामा

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या मार्गावर असतानाच निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. अरुण गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. देशाच्या निवडणूक आयोगाकडे आधीच एक जागा रिक्त होती आणि आता ती फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे उरली आहे. अरुण गोयल हे 1985 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 18 नोव्हेंबर 2022 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याच्या एका दिवसानंतर त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.लोकसभेच्या तारखा पुढच्या आठवड्यात जाहीर होणार होत्या. परंतु आता निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यामुळे त्या पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

अन्य निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे हे फेब्रुवारी महिन्यातच निवृत्त झाले असून गोयल यांच्या राजीनाम्यामुळे तीन सदस्यांच्या निवडणूक आयोगात केवळ मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार हेच शिल्लक राहिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भात एक नवा कायदा तयार करण्यात आला असून कायदा मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शोध समिती ही आयुक्तांचा शोध घेण्याचे काम करेल. यामध्ये दोन केंद्रीय सचिवांचा देखील समावेश असून तीच समिती पाच जणांची नावे निश्चित करणार आहे. त्यानंतर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील निवड समिती ही मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचे काम करते. या समितीमध्ये केंद्रीय मंत्री तसेच लोकसभेतील विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश असतो. कोणीही विरोधी पक्ष नेता नसेल तर सर्वांत मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला या समितीमध्ये स्थान देण्यात येते. या समितीने हिरवा झेंडा दाखविल्यानंतरच राष्ट्रपती हे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांची नेमणूक करतात.

Protected Content