मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुप्रसिध्द लेखक, दिग्दर्शक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.
गेली तीस वर्षे गोरे यांनी साहित्य संवर्धनाच्या अतुलनीय कार्याव्दारे आजवर १७६ हून अधिक राज्यस्तरीय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन केले आहे. इतकी साहित्य संमेलनं आयोजित करणारे ते साहित्य विश्वातील एकमेव व्यक्ती आहेत, त्यांनी आपल्या अमोघ वाणीतून २ हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत, फर्डे वक्ते म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत, त्यांनी मराठी चित्रपट लेखक, दिग्दर्शक, संगीतकार व अभिनेता म्हणून काम केले आहे.
त्यांच्या ‘एक प्रेरणादायी प्रवास, सूर्या’ या चित्रपटास फ्रान्समधील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व जर्मनीतील बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून आपली जागतिक स्तरावर मोहर उमटवली आहे. विविध विषयांवर आजवर हजारो व्याख्याने त्यांनी दिली आहेत. आपल्या अनोख्या भाषणशैलीसाठी ते विशेष परिचित आहेत.आजवर १० ग्रंथांचे विपुल लेखन त्यांनी केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृतमध्ये लिहिलेल्या ‘बुधभूषण’ या ऐतिहासिक ग्रंथाचा गोरे यांनी मराठीत काव्य अनुवाद केला आहे. तो रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. ते प्रकाशक व संपादक असलेल्या युगंधर प्रकाशन या संस्थेने १५० हून अधिक दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली आहेत.