शंकर टेमघरे यांना ‘भागवत धर्म प्रसारक’ पुरस्कार जाहीर

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । श्री संत मुक्ताबाई संस्थान, श्री क्षेत्र कोथळी -मुक्ताईनगर यांच्या वतीने दिला जाणारा ” भागवत धर्म प्रसारक ” पुरस्कार शंकर टेमघरे (पुणे ) यांना जाहीर झाला आहे.

श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर येथे या पुरस्काराची घोषणा श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी केली . मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाई यांच्या पालखीने आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे आज प्रस्थान ठेवले या पार्श्वभूमीवर या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे आणि विश्वस्त उपस्थित होते.

ॲड पाटील म्हणाले , श्री संत मुक्ताबाई संस्थानचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भाऊसाहेब उर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या वारकरी सांप्रदायातील एका पत्रकाराला २०१९ पासून “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते . २०१९ चा पुरस्कार महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांना देण्यात आला होता. त्यानंतर कोरोनामुळे सलग दोन वर्षे या पुरस्काराचे वितरण करता आले नाही.

हा पुरस्कार आषाढी एकादशीच्या दिवशी रविवार दि . १० जुलै २०२२  रोजी दुपारी २ वाजता श्री संत मुक्ताबाई संस्थान मठ , श्री क्षेत्र पंढरपूर येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

श्री. टेमघरे हे १९९५ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत आहेत. साप्ताहिक शिवतेज, अलंकापुरी , दैनिक लोकसत्ता , देशदूत , ऐक्य , पुढारी , सकाळ या दैनिकांत काम करीत असून संत साहित्याचा त्यांचा अभ्यास आहे. १९९६ पासून वारीचे वार्तांकन करीत असून सकाळ वृत्तपत्र व  साम टीव्ही वाहिनीवर वारी विशेष मालिकेचे संकल्पना, संशोधन, लेखन करीत आहेत. त्यांनी संत नामदेव  महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेमभंडारी आणि ज्ञानभंडारा या पुस्तकांचे लेखन केले आहे.

 

Protected Content