मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा| राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने अट्टाहासाने तिसरा उमेदवार उभा केला असून त्या माध्यमातून अपक्ष आमदारांवर अप्रत्यक्षपणे ईडी, सीबीआयच्या माध्यमातून दबाव, भीती आणि अन्य आमिष दाखवले जाणार असले तरी महाविकास अर्थात शिवसेनचे उमेदवार यशस्वी होणार असल्याचा टोला संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
राज्यसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातलं राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपामधील चर्चा अपयशी झाल्याने राज्यसभेची निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूंनी ताकदपणाला लावली जात असून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ज्यांचं मतदान महत्त्वाचं ठरणार आहे, अशा अपक्ष आमदारांवर भाजपाकडून ईडी-सीबीआयच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचे शिवसेना प्रवक्ते तथा खा. संजय राऊत म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समर्थ नेतृत्वाखाली आम्ही ताकदीने निवडणुकीत उतरलो आहोत. राज्यात अशा पद्धतीने निवडणुका लढवल्या जात असतील, तर राज्याची जनता डोळसपणे पाहात आहे. चारही जागा महाविकास आघाडी व्यवस्थित जिंकणार आहे. उगीच भाजपाने त्यांचे पैसे अपक्षांवर वाया घालवू नयेत. एखाद्या सामाजिक कार्यात लावावेत. महाराष्ट्राचे प्रश्न सहाव्या जागेचा आहे. त्यासाठी भाजपा अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. म्हणजे ते त्यांना आमिष दाखवत, ईडी, काही जुनी प्रकरणं उकरून सहाव्या जागेसाठी भाजपाकडून अपक्ष आमदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
आमच्या हातात ईडी, सीबीआय नाही. पण इतर अनेक गोष्टी आमच्या हातात असून निवडणुकांचा सर्वात जास्त अनुभव आम्हाला आहे. अपक्ष आमदारांवर टाकल्या जाणाऱ्या दबावातून भाजपाचेच चरित्र उघड होत आहे. बहुजन विकास आघाडी, एमआयएम, बच्चू कडू, शेतकरी संघटना, कोणते अपक्ष आमदार कुणाच्या बाजूने आहेत, कोण कुणाबरोबर आहे, हे १० तारखेला निवडणुकीच्या दिवशी कळेलच, असेही राऊत म्हणाले.