शंकर गोरे यांनी स्वीकारला चाळीसगावच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार

चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या १३ महिन्यांपासून रिक्त असलेल्या येथील पालिकेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे अखेर शंकर गोरे यांनी स्वीकारली आहेत.

चाळीसगाव पालिकेला अखेर कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले आहेत. कोकण विभागात नगर परिषद प्रशासन उपसंचालक असलेले शंकर गोरे यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. गेल्या वर्षी २४ जुलै २०१९ रोजी तत्कालीन पूर्णवेळ मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची पंढरपूर येथे बदली झाली होती. तेव्हापासून पालिकेला मुख्याधिकारी नव्हते. यामुळे शहरातील विकासकामांमध्ये अडसर निर्माण झाला होता.

या पार्श्‍वभूमिवर, आता शंकर गोरे यांच्या रूपाने पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले आहेत. विशेष बाब म्हणजे गोरे यांनी याआधी सन २००७ ते ११ या दरम्यान पालिकेचे मुख्याधिकारी पद सांभाळले आहे. येथे काम करण्याचा अनुभव असल्याने ते चाळीसगावच्या विकासाला गती देतील अशी अपेक्षा आहे. शंकर गोरे यांचे कर्मचार्‍यांनी अतिशय जल्लोषात स्वागत केले.

Protected Content