जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बालविवाहासारख्या सामाजिक अनिष्ट प्रथेविरोधात शनिपेठ पोलिसांनी कठोर भूमिका घेत जळगाव शहरातील दोन बालविवाह यशस्वीपणे रोखले आहेत. जमुना नगर आणि कांचन नगर परिसरात होणारे हे दोन बालविवाह पोलिसांच्या सतर्कतेमुळे थांबविण्यात आले. यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालविवाह करणाऱ्यांविरोधात कोणतीही पूर्वसूचना किंवा समुपदेशन न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.
शनिपेठ पोलीस ठाण्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, २२ जून २०२६ रोजी जळगाव शहरातील जमुना नगर परिसरात होणारा एक बालविवाह तसेच १० जुलै २०२६ रोजी कांचन नगर येथील बिंदुबाई हॉलमध्ये होणारा आणखी एक बालविवाह पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे रोखण्यात आला. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह होण्यापासून प्रतिबंध केला.

या कारवाईनंतर शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालविवाह निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, अशा प्रकारच्या घटनांवर पोलिसांचे २४ तास लक्ष राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असेही पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे किमान वय १८ वर्षे आणि मुलाचे किमान वय २१ वर्षे असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह लावल्यास बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकरणांमध्ये केवळ मुला-मुलींचे पालकच नव्हे, तर विवाहास संमती देणारे नातेवाईक, विवाह लावणारे पुरोहित किंवा काझी, मंडप डेकोरेटर्स, बँड पथक, वाजंत्री तसेच छायाचित्रकार यांनाही सहआरोपी करण्यात येणार आहे. दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरी, एक लाख रुपयांपर्यंत दंड तसेच संबंधित व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल दातीर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने सहभाग घेतला.



