यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव व परिसरात ११ ऑगस्टपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांसमोर नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. सावखेडा सिम रस्त्यालगत असलेल्या गुरांच्या गोठ्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात चारा ओला झाला आहे. त्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे.
मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या वेळीही याच परिसरातील गुरांच्या गोठ्यांमध्ये पाणी शिरले होते. त्यानंतर संबंधित शेतकरी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी करून पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची मागणी केली होती. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही याबाबत तक्रार करण्यात आली होती.

तक्रारीनंतर यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जहाँगीर तडवी यांनी संबंधित परिसराची पाहणी केली. हे काम ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येत असल्याचे त्यांनी सांगितल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. मात्र, ग्रामपंचायतीकडून हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याचे सांगितले जात असल्याने नेमकी जबाबदारी कोणाची, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला आहे.
या विभागीय जबाबदारीच्या गोंधळामुळे पाण्याचा निचरा करण्याचा प्रश्न अद्याप कायम असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. विशेषतः गटारी बांधल्यानंतर याच वर्षी पावसाचे पाणी गोठ्यांमध्ये शिरण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने गटारींचे बांधकाम, त्यांचा उतार आणि पाण्याच्या प्रवाहाचे नियोजन याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
गटारीमध्ये पाणी साचून राहत असल्याने ते ओसंडून परिसरातील गुरांच्या गोठ्यांकडे आणि इतर ठिकाणी जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी गुरांचा चारा भिजत असून पशुपालकांना आर्थिक व दैनंदिन अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाचे पाणी योग्य दिशेने वाहून जाण्यासाठी गटारींचा उतार आणि पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, गटारीत साचलेल्या घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे केवळ पाण्याचा निचरा करण्याचा प्रश्न न राहता हा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर विषय बनला आहे.
संबंधित ठेकेदाराने बांधलेल्या गटारींची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचा उतार योग्य आहे का, पावसाच्या पाण्याचा प्रवाह कुठे वळतो आणि निचऱ्याची व्यवस्था पुरेशी आहे का, याची प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी गटारींची दुरुस्ती करून पाणी तातडीने बाहेर काढण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याचप्रमाणे दहिगावातील आबा नगर परिसरातही पावसाचे पाणी साचून तलावासारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या ठिकाणीही पाण्याचा तातडीने निचरा करण्यात यावा, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल आणि साचलेल्या पाण्यामुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक धोके टाळता येतील, अशी मागणी होत आहे.
प्रशासनातील संबंधित विभागांनी एकमेकांकडे जबाबदारी ढकलण्याऐवजी संयुक्तपणे पाहणी करून पाण्याच्या निचऱ्याचा कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेषतः सध्या पावसाळा सुरू असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्यापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
दहिगावात गुरांच्या गोठ्यांमध्ये पाणी शिरून चारा भिजण्याबरोबरच गटारीतील साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे. आबा नगरातील साचलेल्या पाण्याचाही तातडीने निचरा करून ग्रामस्थांच्या आरोग्याचे संरक्षण करावे आणि गटारींच्या बांधकामातील त्रुटी दूर करून कायमस्वरूपी पाणी निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



