सेरेना विल्यम्स अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

serena williams 1

 

न्यूयॉर्क वृत्तसंस्था । चोविसाव्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेली अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीमधील अंतिम फेरीत धडक मारली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपांत्य फेरीत आठव्या मानांकित सेरेनाने युक्रेनच्या पाचव्या मानांकित एलिना स्वितोलिनावर ६-३, ६-१ अशी मात केली. सेरेनाने अवघ्या ७० मिनिटांमध्ये हा सामना जिंकला. या स्पर्धेतील सेरेनाचा हा १०१ वा विजय असून, तिने दहाव्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या महान टेनिसपटू मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमी २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी करण्यासाठी सेरेनाला एका विजेतेपदाची आवश्यकता आहे. सेरेनाने आतापर्यंत सहा वेळा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकलेली आहे. मागील वर्षीच्या विम्बल्डनपासून सेरेनाला तीन वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. दुसऱ्या उपांत्य सामन्यात १९ वर्षीय आंद्रेस्कूने स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेंसिसचा ७-६(७-३), ७-५ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत आंद्रेस्कू १५ व्या, तर बेंसिस १३ व्या स्थानावर आहे. या सामन्याच्या दोन्ही सेटमध्ये बेंसिसने आंद्रेस्कूला कडवी लढत दिली. पहिल्या सेटमध्ये तर बेंसिस ५-२ अशी आघाडीवर होती. तथापि, आंद्रेस्कूने निर्णायक क्षणी झुंजार खेळ करत हा सेट टायब्रेकरपर्यंत नेला आणि टायब्रेकर ७-३ असा जिंकून तिने सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येही आंद्रेस्कूने बेंसिसचा प्रतिकार ७-५ असा मोडून काढला आणि अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.

Protected Content