न्यूयॉर्क, वृत्तसंस्था | ‘दहशतवाद्यांकडून केला जाणारा इंटरनेटचा आणि सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली जात आहे,’ अशी माहिती न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी दिली. ‘सध्या ग्लोबल फोरम टू काउंटर टेररिझम नावाची यंत्रणा कार्यरत आहे, तिचेच रूपांतर कंपनीत केले जात आहे,’ असेही आर्डन यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी बहुतेक राष्ट्रप्रमुख सध्या येथे आले आहेत. न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्टचर्चमध्ये यंदा १५ मार्चला एका माथेफिरूने ‘फेसबुक लाइव्ह’ करीत दहशतवादी हल्ला केला होता. त्यानंतर असे प्रकार रोखण्यासाठी न्यूझीलंडने पुढाकार घेतला आहे. दहशतवादाच्या प्रचार, प्रसारासाठी इंटरनेटचा गैरवापर रोखण्यासाठी कंपनी स्थापण्याच्या कल्पनेला न्यूझीलंड आणि फ्रान्सने पाठिंबा व्यक्त केला आहे.
या संदर्भात पत्रकार परिषदेत आर्डन म्हणाल्या, ‘सध्याच्या यंत्रणेत फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, यू ट्यूब आदी कंपन्यांचा समावेश आहे. नवी कंपनी इंटरनेट प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्याकडून पुरविल्या जाणाऱ्या सेवा पुरते मर्यादित काम करेल. तिला एक कार्यकारी संचालक असेल. त्याची नियुक्ती संचालक मंडळ करेल. या संचालक मंडळाला सल्ला देण्यासाठी सल्लागार मंडळ असेल. त्यात बहुतांश सदस्य बिगर सरकारी असतील. काही सरकारी प्रतिनिधीही असतील.
‘फेसबुक’च्या मुख्य कार्यपालन अधिकारी शेरील सँडबर्ग याही पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या. त्या ग्लोबल फोरम टू काउंटर टेररिझमच्या अध्यक्षही आहेत. सँडबर्ग म्हणाल्या, ‘आम्ही आतापर्यंत सुमारे दोन लाख डिजिटल हातांचे ठसे आमच्या सहयोगींना पाठवले आहेत. कारण दहशतवादी एकाचवेळी अनेक प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात. त्यामुळे कोणत्याही एका ठिकाणी त्यांचा सुगावा लागल्यास तातडीने त्यांना इतर प्लॅटफॉर्मवरूनही हटविले जाऊ शकेल.’ मे महिन्यात पॅरिसमध्ये आर्डन आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन आणि इतर काही नेत्यांनी मिळून ख्राइस्टचर्च कॉलवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यात दहशतवाद्यांना इंटरनेटचा गैरवापर करण्यापासून रोखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता.