चाळीसगावात ट्रकची वीज खंब्याला धडक; चालकावर गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील रेल्वे स्थानकाजवळ भरधाव ट्रकची विजेच्या लोखंडी खंब्याला जोरदार धडक दिल्याने महावितरणचे सुमारे ५० हजार रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या गतीरोधक जवळील महावितरणच्या अतिउच्च दाब वाहिनीच्या (३३ केव्ही रेल्वे वेल्डिंग वर्कस फिडर)च्या एका विद्युत पोलला ट्रकने (एमएच १८, एए ०६८७) जोरदार धडक दिल्याने विद्युत पोल वाकून विद्यूत तारा लोंबकळल्या आहेत. त्यामुळे शहरात काही वेळेपर्यंत वीज पुरवठा हा खंडित झाला होता. हि घटना रविवार, २७ जून रोजी दुपारी ३:१५ वाजताच्या सुमारास घडली असून महावितरण कंपनीला अंदाजे ५० हजाराचे नुकसान झाले आहेत. ट्रक चालकाला त्याचे नाव विचारले असता शेख गफ्फार शेख गणी मुजावर (वय- ३८ रा. भोरस ता. चाळीसगाव) असे सांगण्यात आले. त्यावर चाळीसगाव शहर कक्ष- २ मधील सहायक अभियंता भरत धन्यकुमार उकळकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Protected Content