प्रथमच सेन्सेक्स ४१ हजाराच्या पार

share market

 

मुंबई प्रतिनिधी । अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार संबंध सुधारण्याच्या अपेक्षा उंचावल्याने सोमवारी आशियाई बाजारात तेजी दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला. सेन्सेक्सने पहिल्यांदाच ऐतिहासिक विक्रमी टप्पा गाठला आहे. सेन्सेक्स आज (दि.२६) सकाळी व्यवहार सुरू होताच ४१,०२२.८५ अंकांवर खुला झाला. पहिल्यांदाच सेन्सेक्स ४१,००० अंकांच्या पल्याड खुला झाला. दुसरीकडे निफ्टी ३६.४५ अंकांनी वाढून १२,११०.२० अंकांवर खुला झाला.

दरम्यान, कालही शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक ओघ वाढवला. एफपीआयने चालू महिन्यात आतापर्यंत १७,७२२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ऑक्टोबरमध्येही हा आकडा १७,५४७ कोटी रुपये होता. एफपीआयची गुंतवणूक ही बाजारावरील विश्वासासाठी महत्त्वाची मानली जाते.

सुरुवातीच्या व्यवहाराच्या सत्रातच सेन्सेक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. आज सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी सेन्सेक्सचे २१६.४८ अंकांच्या वाढीसह ४१,१०५.७१ अंकांवर व्यवहार सुरू होते. तर निफ्टी ५६.४५ अंकांच्या वाढीसह १२,१३०.२० अंकांवर ट्रेड करत होता. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ज्या समभाग खरेदीत गुंतवणुकदारांनी रस दाखवला, त्यात येस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, ओएनजीसी आणि सन फार्मा यांचा समावेश होता. दुसरीकडे भारती एअरटेल, पावरग्रीड, बजाज ऑटो, अॅक्सिस बँक आणि एलअँडटी यांच्या समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली.

Protected Content