संजय राठोड पुन्हा अडचणीत

 

मुंबई : वृत्तसंस्था । पूजा चव्हाण कथित आत्महत्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले वनमंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. काल  पोहरादेवी येथे  कोरोना नियमांचे उल्लंघन त्यांच्यामुळे झाल्याचा ठपका त्यांच्यावर आला आहे

 

वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन करत संजय राठोड यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र यावेळी हजारोंच्या संख्येने गर्दी जमवत कोरोनासंबंधित नियमांचं उल्लंघन केल्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून संबंधितांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. यादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

 

“पोहरादेवीत जी हजारोंच्या संख्येने गर्दी जमा झाली होती तसंच नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कायदा आणि नियमांचं पालन करण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. मग कोणी आपलंही का असेना….मुख्यमंत्री त्यांना सोडणार नाही, सरकार सोडणार नाही. चूक झाली असेल तर कायदा आपलं काम करेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून अहवाल मागवण्याच्या सूचना मुख्य सचिव संजय कुमार यांना दिल्या आहेत.

Protected Content