जळगाव, प्रतिनिधी | येथील बहिणाबाई उद्यानाशेजारी आज सकाळी एका पोत्यात विविध जातीचे १० जीवंत साप आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या सगळ्या सापांना वनविभागाच्या मदतीने जंगलात सोडण्यात आले आहे.
बहिणाबाई उद्यानाशेजारी कचरा वेचणाऱ्या मुलास सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास एका पोते आढळून आले. ते बंद पोते त्याने उघडले असता त्यात त्याला बाटल्यांमध्ये जिवंत साप दिसले, यामुळे त्याची तारांबळ उडाली. त्याने हा प्रकार जवळील कचरा डेपोत सांगितला. याबाबत मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी सर्प मित्रांशी संपर्क साधून याबाबत कल्पना दिली. त्यानंतर वन्य जीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यात योगेश सपकाळे, खेमराज सोनवणे, कार्याध्यक्ष ऋषी राजपूत, संघटक निलेश ढाके, अमोल देशमुख, बाळकृष्ण देवरे यांचा समावेश होता. या सर्पमित्रांनी गोणीची तपासणी केली असता त्यांना त्यात तीन मण्यार, दोन कोब्रा, धामण, दिवळ, कवड्या, डुरक्या घोणस जातीचा प्रत्येकी एक साप आढळून आला. सर्पमित्रांनी याबाबत वन विभागाला कळविले, असता रेंजर अश्विनी ठाकरे ह्या तेथे दाखल झाल्या. त्यांनी या सर्व सापांचा पंचनामा केला. यानंतर हे सर्व साप त्यांनी सर्पमित्रांच्या मदतीने लांब जंगलात नेवून सोडले. दरम्यान, उद्या असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त असल्याने साप तस्करांनी हे साप सोडून पोबारा केल्याची चर्चा शहरात रंगली आहे.