


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरखेडी (ता. पाचोरा) येथील सावखेडा रस्त्यावरील महासर माता राईस मिलवर ७ सप्टेंबरच्या मध्यरात्री तहसीलदार आणि पुरवठा विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकून तपासणी केली. भडगाव परिसरात रेशनचा तांदूळ वाहून नेणारा ट्रक पकडण्यात आल्यानंतर या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती आहे. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे महसूल व पुरवठा विभागाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित राईस मिलमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या तांदळाचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे पुरवठा विभागाच्या पथकाने मिलमध्ये अचानक प्रवेश करून उपलब्ध धान्यसाठ्याची तपासणी केली. यावेळी मिलमधील तांदळाचा साठा, आवक-जावक रजिस्टर तसेच संबंधित कागदपत्रांची झाडाझडती घेण्यात आली.
रेशनिंगच्या माध्यमातून गोरगरीब आणि गरजू लाभार्थ्यांसाठी उपलब्ध होणारे धान्य बेकायदेशीररीत्या गोळा करून त्यावर प्रक्रिया अथवा पॉलिश करून खुल्या बाजारात विक्री केली जात असल्याचा संशय या कारवाईनंतर व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, संबंधित तांदूळ नेमका रेशनिंगचा आहे की नाही, हे अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
कारवाईदरम्यान पुरवठा विभागाच्या पथकाने मिलमधील तांदळाचे विविध नमुने जप्त केले असून, हे नमुने अधिकृत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती आहे. प्रयोगशाळेच्या अहवालातून तांदळाचा स्रोत आणि त्याचा प्रकार स्पष्ट होण्याची शक्यता आहे. संबंधित तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास मिल मालकाविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणात केवळ राईस मिलपर्यंत तपास मर्यादित न ठेवता धान्याचा पुरवठा करणारे संभाव्य वाहतूकदार, मध्यस्थ किंवा दलाल तसेच धान्याच्या बेकायदेशीर व्यवहारात सहभागी असलेल्या इतर घटकांचीही चौकशी करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. शासकीय धान्याचा गैरवापर झाल्याचे सिद्ध झाल्यास संपूर्ण साखळीचा तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
विशेष म्हणजे, वरखेडी परिसरात तांदळाची मोठ्या प्रमाणावर शेती होत नसताना संबंधित राईस मिलला परवानगी कशी मिळाली? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी शासकीय तांदूळ आणून त्यावर प्रक्रिया करून खुल्या बाजारात विक्री केली जात असल्याचे आरोप परिसरातून होत आहेत. या आरोपांचीही प्रशासनाने सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
पत्रकारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत मध्यरात्री कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या धाडीनंतर जप्त करण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल काय येतो, तसेच तपासात आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे पाचोरा तालुक्याचे लक्ष लागले आहे.



