Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरच्या ज्ञानपूर्ण विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

मुक्ताईनगरच्या ज्ञानपूर्ण विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

0
7


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षणाचा खरा उद्देश केवळ पुस्तकी ज्ञान मिळविणे नसून, संस्कार, देशसेवा आणि समाजसेवेची भावना जोपासणे हा आहे. गुरूंचा अवमान, आई-वडिलांशी द्रोह आणि देशाशी द्रोह टाळून समाज व राष्ट्राच्या हितासाठी कार्य करणे म्हणजेच खरे शिक्षण होय, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा निमखेडी बुद्रुक जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक एन. जी. शेजोळे यांनी केले. इच्छापूर येथील ज्ञानपूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य के. एस. मेढे होते. प्रमुख वक्ते म्हणून एन. जी. शेजोळे व सुधीर मेढे, तर प्रमुख अतिथी म्हणून एकनाथ लोणे उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन शिक्षकांचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी व्यक्त केलेल्या आदरातून गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित झाले.

आपल्या मार्गदर्शनात एन. जी. शेजोळे यांनी शिक्षणाच्या व्यापक अर्थावर प्रकाश टाकला. शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये ज्ञानासोबतच चांगले संस्कार आणि सामाजिक बांधिलकी निर्माण झाली पाहिजे. गुरू, माता-पिता आणि मातृभूमी यांच्याप्रती कर्तव्याची जाणीव ठेवून समाज व देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रम शिकवत नाहीत, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. त्यामुळे शिक्षकांचा आदर करणे आणि त्यांच्या मार्गदर्शनातून उत्तम नागरिक घडण्याचा प्रयत्न करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानपूर्ण विद्यालयाला गौरवपत्र प्रदान करण्यात आले. एन. जी. शेजोळे, एकनाथ लोणे यांच्या हस्ते हे गौरवपत्र देण्यात आले. प्राचार्य के. एस. मेढे, एस. जे. मेढे, विनायक वाडेकर तसेच शिक्षकवृंदांनी गौरवपत्र स्वीकारले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र तायडे यांनी केले, तर विनायक वाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. जे. मेढे, बी. के. महाजन, महेंद्र तायडे, प्रदीप पाटील, मीनल कोल्हे, प्राध्यापक मनोज भोई, चेतन चौधरी, अजिंक्य पाटील, विनोद पाटील, गोपाळ सपकाळ, बेबाबाई धाडे आणि रेणुका लोणे यांनी विशेष प्रयत्न केले.


Protected Content

Play sound