नाशिक-वृत्तसेवा । नाशिकमधील भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली असून या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एका बड्या पदावरील व्यक्तीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याने चर्चेला अधिक उधाण आले आहे. विविध गंभीर आरोपांच्या छायेत सुरू असलेल्या चौकशीमुळे या प्रकरणाचे पडसाद आता राजकीय आणि सहकार क्षेत्रातही उमटू लागले आहेत.
अशोक खरात याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण, भोंदुगिरी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप असून त्याची विविध अंगांनी सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अनेक नेते आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींचे त्याच्याशी संबंध असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. त्यामुळे तपासाची व्याप्ती वाढत असून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या फेडरेशनचे नेतृत्व करत होते. मात्र काही दिवसांपूर्वी अशोक खरात आणि समता पतसंस्थेतील कथित संबंध समोर आल्यानंतर सभासदांमध्ये नाराजी वाढली होती. या दबावामुळेच त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अंतर्गत सुमारे १५ हजार पतसंस्था कार्यरत असून हजारो सभासदांचा या संघटनेत समावेश आहे. २०१५ पूर्वीपासून अध्यक्षपद सांभाळणारे काका कोयटे यांच्यावर अलीकडेच वाढता दबाव निर्माण झाला होता. अशोक खरात आणि समता परिषदेतील कथित संबंध समोर आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
दरम्यान, समता पतसंस्थेत अशोक खरात तब्बल १०० खात्यांना नॉमिनी असल्याचे समोर आले असून या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती पुढे आली आहे. याच पार्श्वभूमीवर काका कोयटे हे खरातचे समर्थक असल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र यावर स्पष्टीकरण देताना कोयटे यांनी आपण खरातचे भक्त नसून कोणत्याही भोंदूशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले की, एका कार्यक्रमात अशोक खरात उपस्थित होता एवढाच संबंध असून समता पतसंस्थेत उघडण्यात आलेली खाती ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनच उघडण्यात आली होती. कोविड काळात अनेक खाती ऑनलाइन पद्धतीने उघडली गेली होती. ज्यांचा संबंध नसल्याचा दावा आहे त्यांनी त्याचे पुरावे पोलिसांना सादर करावेत, असेही त्यांनी नमूद केले.
अशोक खरात प्रकरणातील वाढती गुंतागुंत, आर्थिक व्यवहारांचे स्वरूप आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध यामुळे तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



