ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचे निधन


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत (वय 91) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी लालबागमधील दिग्विजय मिल पत्रा चाळ येथील त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघणार असून, भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सावंत यांनी अनेक वर्षे साप्ताहिक ‘मार्मिक’मध्ये कार्य केले. त्यांची पत्रकारिता नेहमीच रोखठोक आणि स्पष्ट मत मांडणारी होती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालयाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार यांसारख्या सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

सावंत यांचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील नायगाव सशस्त्र पोलिस मुख्यालयात कमांडर होते. 1944 च्या बॉम्बस्फोटानंतर त्यांचे कुटुंब महाड आणि नंतर कोकणातल्या विन्हेरे येथे स्थायिक झाले. सुरुवातीला त्यांनी गावातील शाळेत शिक्षक म्हणून काम केले. नंतर मुंबईत एका कारखान्यात, बस कंडक्टर, महापालिकेच्या शाळेत शिक्षक अशी विविध नोकऱ्या करत त्यांनी आपला संघर्षमय प्रवास सुरू ठेवला.

सावंत यांचा साप्ताहिक ‘मार्मिक’सोबतचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा होता. 1967 मध्ये इस्रायल-अरब युद्धावर त्यांनी लिहिलेला निबंध मार्मिकमध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर ते या साप्ताहिकाशी कायमचे जोडले गेले. त्यांनी श्री, प्रभंजन, सिने ब्लिट्झ, लोकमत, आणि पुढारी यांसारख्या विविध माध्यमांत काम केले.

सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जवळून काम केले. बाळासाहेबांचे ते विश्वासू शिलेदार मानले जात. 1972 च्या महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाचे केलेले त्यांचे वार्तांकन विशेष गाजले. जयप्रकाश नारायण यांच्या बिहार आंदोलनाचेही त्यांनी प्रभावीपणे वृत्तांकन केले. सावंत यांचे ‘मी पंढरी गिरंगावचा’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे, ज्यात लालबाग-परळ परिसरातील गिरणी कामगारांचे जीवन प्रभावीपणे उभे राहते. तसेच, त्यांनी लिहिलेले हिटलरवरील पुस्तकही वाचकप्रिय ठरले आहे.