ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक शंकर आप्पा महाजन अनंतात विलिन

shankar aappa

सावदा, प्रतिनिधी | येथील रहिवासी आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकशंकर आप्पा महाजन यांचे आज सकाळी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९७ वर्षे होते. त्यांचे सुपुत्र अनिल महाजन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे ओएसडी आहेत.

 

सावदा येथे ते स्टॅम्प वेंडरचे काम करायचे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या जीवनाची सुरूवात केली. नंतर तलाठी म्हणून ते काम करू लागले. या नोकरीत त्यांचा महसूल विभागाचा गाढा अभ्यास झाला होता. अनेक अधिकारी ‘महसूल’शी संबंधित विषयांची त्यांच्याशी चर्चा करायचे. सावदा व पंचक्रोशीत तब्येतीने अत्यंत तंदुरुस्त अशीही त्यांची ख्याती होती. विविध विषयांवर त्यांचा दांडगा अभ्यास होता. एक दानशूर व्यक्तीमत्व असलेल्या आप्पांनी स्वखर्चातुन एकूण ५६ लाख रुपये खर्च करून येथे महादेव मंदिराचे बांधकाम केले होते. त्यांच्यावर शनिवारी येथील वैकुंठ धाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे पुत्र अनिल महाजन यांनी मुखाग्नी डाग दिला. यावेळी शासनातर्फे फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार अभिलाशा देवगुणे यांनी पुष्पचक्र वाहून शासकीय मानवंदना दिली. तसेच यावेळी पोलीस दलातर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, स.पो.नि राहुल वाघ व पोलीस सहकारी यांनी पोलीस मानवंदना दिली. शंकर अप्पा यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे

Protected Content