जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 40 टक्याच्यावर दिव्यांग, 85 वर्षे वयाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक, तसेच अंथरूनाला खिळून असलेल्या गंभीर आजारी मतदाराकरिता घरी बसल्या मतदान करण्याची सोय करून देण्यात आली आहे. जळगांव जिल्ह्यात 3 मे 2024 पासून होम वोटिंग ला सुरुवात करण्यात आली असून नाशिक विभागातील या लोकसभा निवडणुकीत सुशीला लेंबा राणे मु. पो. सावदा ता. रावेर ( मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र) मतदान करणाऱ्या पहिल्या मतदार ठरल्या. मुक्ताईनगर मधील नियोजित एकूण 55 पैकी 52 मतदारांनी घरी बसल्या आपला मतदानाचा हक्क बजाविला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
शुक्रवार दि.03 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित,अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,उपजिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आदी. यावेळी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने जेष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव तसेच अंथरुणाला खिळून असलेल्या मतदारांसाठी घरून मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. या विशेष मोहिमेला 3 मे पासून सुरुवात करण्यात आली असून मुक्ताईनगर तालुक्यात पहिल्याच दिवशी ही मोहीम राबविण्यात आली. पहिल्या दिवशी घरी बसून सर्वात आधी सुशीला लिंबा राणे रा. सावदा ता. रावेर या वयोवृद्ध महिला मतदाराने आपला मतदानाचा हक्क घरी बसून बाजावला. तर शंकर दामू राऊत या वयोवृद्ध पुरुष मतदारासोबतच, श्रीमती रुपाली जगन्नाथ कोलते, रा. सलबर्डी ता. मुक्ताईनगर या दिव्यांग महिला मतदाराने घरी बसल्या मतदानाचा हक्क बजावला. मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात एकूण 52 मतदारांनी 3 मे रोजी घरी बसल्या आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील इतर मतदार संघात 4 व 5 मे रोजी होम वोटिंग मोहीम राबविण्यात येणार आहे. होम वोटिंग या मोहिमेत आचार संहिता व भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे कोठेही उल्लघन होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देखील पथकाला देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या वेळी दिली. घरी बसून मतदान करणाऱ्यासाठी मतदाराच्या घरीच छोटेसे मतदान केंद्र उभारण्यात येते व मतदान केंद्रावर ज्या प्रमाणे प्रक्रिया पार पाडली जाते तशीच प्रक्रिया होम वोटिंग च्या दरम्यान पार पाडली जात असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी या वेळी दिली.