एरोबिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी माही व आयुष यांची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या माही फिरके व आयुष वंजारी या खेळाडूंची १८ व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. शेगाव, जिल्हा बुलढाणा येथे झालेल्या २३ व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेमधून या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

या राष्ट्रीय स्पर्धा दि. २२ ते २४ मार्च दरम्यान मौलाना आझाद स्टेडियम, जम्मू येथे होत आहेत. या स्पर्धा भारतीय जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या मान्यतेने होणार आहेत. एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीचे हे खेळाडू या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील वयोगटात मिश्र दुहेरी या सादरीकरण प्रकारात सहभागी होणार आहेत. या दोन्ही खेळाडूंची सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झालेली आहे. हे खेळाडू एरोबिक जिम्नॅस्टिक्सचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. नीलेश जोशी यांच्या मार्गर्शनाखाली सराव करतात.

डॉ. नीलेश जोशी यांची देखील या स्पर्धेत पंच मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, एकलव्य क्रीडा संकुलाचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र नारखेडे, जळगाव जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे सचिव प्रवीण पाटील, अक्षय सोनवणे आदींनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

Protected Content