शेट्टी यांचा पत्ता कट होण्याचे संकेत: खडसेंबाबत उत्सुकता

मुंबई,  ।  १० महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या यादीत माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव अडचणीत आल्याचे वृत्त आहे. यामुळे त्यांच्या नावावर फुली पडणार असल्याचे निश्‍चीत झाले आहे. तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबाबत नेमके काय होणार याची मोठी उत्सुकता लागली आहे.

 

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नियुक्ती आता लवकरच होणार असल्याच संकेत मिळाले आहेत. मात्र यात थोडा बदल होण्याची शक्यता आहे. सरकारने पाठवलेल्या बाराजणांच्या यादीत राष्ट्रवादीकडून राजू शेट्टी यांचे नाव देण्यात आले. गेले दहा महिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या यादीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. या यादीवर योग्य निर्णयघेऊ, इतकेच आश्वासन राज्यपालांनी दिले.

याप्रसंगी राज्यपालांनी काही नावांवर आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे. शेट्टी गेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेमधून शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून पराभूत झाले. हाच पराभव राजू शेट्टी यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीत अडसर बनल्याचे सांगितले जाते. याच निकषावर राजभवनावर गेलेल्या यादीत नाव असलेले प्रा. यशपाल भिंगे आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचीही नियुक्ती अडचणीत येऊ शकते. तर एकनाथराव खडसे यांच्या विरूध्द चौकशी सुरू असल्याने त्यांच्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

 

दरम्यान, राज्यपालांच्या चर्चेनंतर राजू शेट्टी यांच्या जागी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंट टकले यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर एकनाथराव खडसे यांच्याबाबत काय होणार या संदर्भात अजूनही स्पष्टता आलेली नाही. तथापि, त्यांच्या नियुक्तीचे काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 

Protected Content