प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या पथसंचलनात जैन फाऊंडेशन पथकाची निवड

जळगाव प्रतिनिधी ।  स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून भारत सरकारच्या सांस्कृतिक आणि संरक्षण मंत्रालयाने वंदे भारतम-नृत्य उत्सव ही राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशनच्या विद्यार्थी कलाकारांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या कलाकारांना प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक शोभायात्रेत त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एकात्मता आणि कला संपदेचा उत्कृष्ट आविष्कार यांचा सुरेख समन्वय असलेला ‘वंदे भारतम्’ उपक्रम आयोजित केला होता. देशभरातील सर्वोत्तम नृत्य प्रतिभा निवडणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. प्रस्तुत उपक्रमात सहभागी होण्याकरिता नोव्हेंबर महिन्यात एकूण ३८७२ संघांनी नोंदणी केली होती. १८० फोक (लोकनृत्य), ८० क्लासिकल, ७० ट्रायबल आणि ४० फ्यूजन प्रकारात हे नोंदणीचे विभाग दिले होते. महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांद्वारा विविध संघांच्या माध्यमातून ३४ नृत्य सादर करण्यात आले, त्यातून १२ संघ नृत्यांची निवड झाली होती. जळगाव जिल्हातील १५ संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत नृत्य सादर केले होते. त्यातून १२ नृत्यांची निवड झाली होती. दिनांक ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली, त्यात २८ राज्यातल्या नृत्य संघांचा सहभाग होता. विविध विभागात एकूण २१ व्हर्च्युअल इव्हेंट झाले, त्यात ३६२२ कलावंतांनी सहभाग घेतला होता. दि, ९ डिसेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील स्तरावरील स्पर्धा मुंबई, कलकत्ता, दिल्ली व बेंगलुरु येथे झाली, त्यात १३२२ स्पर्धकांनी नृत्य सादरीकरण केले. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत ७ राज्याच्या ३८ संघ नृत्यांचे सादरीकरण झाले. त्यातून फक्त १५ संघांची निवड करण्यात आली होती. दि. १९ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली होती.

८५० संघामधून नॅशनल ग्रॅण्ड फिनालेसाठी ६५ संघ सहभागी झाले. यातून राजपथावरील पथसंचलनासाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या संघाची निवड करण्यात आली. निवडीबाबतचे प्रमाणपत्र सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री श्रीमती मीनाक्षी लेखी, रक्षा आणि पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती इला अरुण, शिबानी कश्यप, प्रतिभा प्रल्हाद, शोभना नारायण यांच्यासह परीक्षक गीतांजली लाल, मैत्रेयी पहारी, संतोष नायर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. मान्यवर परीक्षकांच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या आणि विशेष गुणवत्तेत असलेल्या निवडक १६ संघांची निवड करण्यात आली आहे. अभिमानास्पद बाब म्हणजे, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या संघाने निवड समितीच्या सर्व चाचण्या पार करीत परिश्रम आणि कला-कौशल्य नैपुण्यासह स्पर्धांमध्ये क्रमाक्रमाने यश प्राप्त केले. दि. २६ जानेवारी २०२२ रोजी, प्रजासत्ताकदिनी दिल्लीत नव्याने तयार होणाऱ्या सुशोभित जनपथावर सांस्कृतिक पथसंचलनात नृत्य सादर करण्याची संधी या निवडलेल्या संघांना प्राप्त झाली आहे. भारतातील तज्ज्ञ कोरिओग्राफर्सकडून निवड झालेल्या नृत्य संघातील सर्व कलावंतांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. सोनल मानसिंग, शोभना नारायण, शिबानी काश्यप, ईला अरूण, प्रतिभा प्रल्हाद, गीतांजली लाल, संतोष नायर, मैत्रेयी पहारी यांनी काम पाहिले.

राष्ट्रीयस्तरावरील ‘वंदे भारतम्-नृत्य उत्सवा’त भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचालित अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे माजी विद्यार्थी सहभागी होऊन यशस्वी झाल्याचा आनंद अधोरेखित करण्यासारखा आहे. अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलची स्थापना श्रद्धेय डॉ. भवरलाल जैन तथा मोठ्याभाऊंनी केली. सामाजिक बांधिलकीच्या अंत:प्रेरणेने विविध समाजोपयोगी उपक्रम त्यांनी हाती घेतले. सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक या सर्व उपक्रमातील शैक्षणिक उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग या दृष्टीने अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलकडे पाहिले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजघटकातून विद्यार्थ्यांची रितसर निकषांनुसार निवड करून अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये प्रवेश दिला जातो.

सांस्कृतिक उपक्रमात निवड झालेले कलावंत

वेदांत बागडे, हेमंत माळी, विरेंद्र ताडे, उमेश झुरके, ललित हिरे, पवन खोडे, सनी शेटे, सचिन राजपूत, रोशन पवार, निकेश जाधव, रोहन चव्हाण, सुमीत भोये, मंगेश चौधरी, निर्मल राजपूत, रितीक पाटील हे असून, संघ प्रमुख सौ. रूपाली वाघ, नृत्यशिक्षक म्हणून नाना सोनवणे आणि सीमा गंगाणी यांनी मेकअप आर्टिस्ट या नात्याने जबाबदारी सांभाळली. या सर्व कलावंतांचे भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी अभिनंदन केले.

प्रजासत्तादिनाच्या परेडसोबत राजपथावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळणार आहे. राजपथावर चालण्याचा आनंद खूप मोठा आणि अभिमानस्पद आहेच. आयुष्याच्या राजपथावर चालताना मात्र कर्तव्य भावनेने आयुष्य यशस्वी आणि सार्थक करायचे असेल तर भवरलालजी जैन अर्थात आमचे प्रिय दादाजींच्या विचारांच्या राजपथावर मला चालावे लागणार आहे, तोच माझा ध्यास आहे!

– पवन अर्जून खोंडे (विद्यार्थी कलावंत)

श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी ‘जे जे उत्तम-उदात्त-उन्नत म्हणती ते ते शोधत रहावे या जगती!’ या व्यापक विचारांसह समाजातील गुणवत्तेकडे पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय एकात्मता आणि कला संपदेचा उत्कृष्ट आविष्कार’ यांचा सुरेख समन्वय असलेला ‘वंदे भारतम्’ उपक्रम आयोजित केला होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक पथसंचलनात कान्हदेशातील भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या पथकाची निवड झाली आहे, ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. ‘चांगलं पेराल तर चांगलच उगवतं!’ वाडवडिलांनी सांगितलेल्या संस्कारांचीच ही फलश्रुती! कलावंतांना स्वप्रतिभेचा आविष्कार सादर करण्याची संधी प्राप्त होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे हृदयापासून अभिनंदन.

-अशोक जैन (अध्यक्ष, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन)

 

Protected Content