राफेल विमानांची दुसरी तुकडी सज्ज

नवी दिल्ली वृत्तसंस्था । राफेल विमानांची दुसरी तुकडी भारताच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती लवकरच भारतीय हवाईदलात तैनात करण्यात येणार आहेत.

फ्रान्सकडून देण्यात आलेल्या पहिल्या पाच राफेल विमानांचा १० सप्टेंबर रोजी एका औपचारिक कार्यक्रमाद्वारे हवाई दलात समावेश करण्यात आला होता. ही विमाने अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर तैनात करण्यात आली आहेत. यानंतर, फ्रान्सने आणखी पाच लढाऊ राफेल विमाने भारताला सोपविण्याची तयारी सुरू केली आहे. ही विमाने सध्या फ्रान्समध्येच असून ती ऑक्टोबर महिन्यात ही विमाने पश्‍चिम बंगालमधील हवाई दलाच्या कलईकुंडा तळावर तैनात केली जाणार आहेत. भारताने राफेल विमानांत काही बदल करवून घेतले आहेत. त्यानुसार ही विमाने कमी तापमानातही सहजपणे सुरू करता येतील.

फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युअल लेनेन यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, पाच राफेल विमानांचा समावेश असलेली दुसरी बॅच भारताला सोपविण्यात आली आहे. ही विमाने फ्रान्समधून कधीपर्यंत घेऊन जायची हे भारत सरकारवर अवलंबून आहे.

Protected Content